मुंबई : सुमारे वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर 3 जानेवारी 2022 पासून देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांचंही कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचं संकट उंबरठ्यावर उभं असल्याचं दिसून येतं. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाच्या निर्णयाला अधिकच महत्त्व प्राप्त होत असल्याचं दिसून येतं.
सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेलं हे नवं कोरोना व्हेरियंट संपूर्ण जगाची डोकेदुखी बनलं आहे. आता भारतातही या व्हेरियंटने बाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं आकडेवारी सांगते.
ओमिक्रॉन व्हेरियंटशी दोन हात करण्यासाठी भारत सरकारने लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रित केलं. या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत.
त्या अंतर्गत 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्यात येईल. तर 10 जानेवारी 2022 पासून आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी तसंच 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लशीचा बूस्टर डोस (तिसरा डोस) देण्यात येणार आहे.