अमरावती:अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (डफरीन) नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU / NICU) सोमवारी भल्या पहाटे लागलेल्या भीषण आगीत तीन अर्भकांचा धुरामुळे गुदमरून व होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे 36 नवजात बालकांचे प्राण वाचले आहेत.

जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात तीन कक्ष असून तेथे एकावेळी 39 बालके उपचार घेऊ शकतात. घटनेच्या वेळी विभागात 39 बालके दाखल होती. यापैकी आग लागलेल्या कक्षात 12 नवजात बालके होती.
रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील SNCU मध्ये व्हेंटिलेटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने स्फोट झाला आणि आग वेगाने संपूर्ण कक्षात पसरली. धुराचे लोट दिसताच ऑन ड्युटी डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. धुरामुळे श्वास घेणे कठीण असतानाही कर्मचाऱ्यांनी बाळांना बाहेर काढले. जखमी बालकांना तात्काळ विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय व पीडीएमसी रुग्णालयात हलवण्यात आले.
या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी *सात सदस्यीय समिती* स्थापन करण्यात आली आहे.
मृत बालकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी *5 लाख रुपयांची* आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून जखमी बालकांवर सरकारी खर्चाने उपचार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावर बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, _”सरकारी व खासगी रुग्णालयांसाठी फायर ऑडिट अनिवार्य असूनही ही दुर्दैवी घटना घडली. घटनेचे नेमके कारण तांत्रिक तपासणीतून शोधले जाईल. रुग्णालयातील निष्काळजीपणा, उपकरणे, साहित्य व परवानग्यांशी संबंधित त्रुटी यांचीही चौकशीत पाहणी केली जाईल. तपासात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
