कोल्हापूर:स्तनपान केवळ बाळासाठीच फायदेशीर नाही, तर ते आईसाठीही उपयुक्त आहे. आई आणि बाळामधील भावनिक बंध निर्माण करण्याव्यतिरिक्त, स्तनपान दोघांसाठी आरोग्यदायी आहे, असे मत रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर आणि भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी व्यक्त केले. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पंचगंगा हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिलांनी आपल्या आरोग्याबाबत दुर्लक्ष करू नये, असेही सौ. महाडिक यांनी नमुद केले.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रम आणि पंचगंगा हॉस्पिटल यांच्यावतीने जागतिक स्तनपान मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर आणि भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, डॉ. तेजश्री तहसिलदार, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचे अध्यक्ष प्रदीप भारमल, सचिव अतुल भालेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नवजात बालकांच्या आरोग्यासाठी आईचे दूध आवश्यक आहे. तसेच स्तनपानाबद्दल घ्यावयाची काळजी, याबद्दलची माहिती डॉ. तेजश्री तहसिलदार यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार, पहिल्या ६ महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचे दूध द्यावे. ते बाळाच्या शारिरीक आणि मानसिक विकासासाठी तसेच रोग प्रतिकारक शक्तीसाठी उत्तम असल्याचे सौ. अरूंधती महाडिक यांनी नमुद केले. रोटरीच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य, मातृत्व आणि नवजात बालकांच्या आरोग्यासाठी, भविष्यात विविध उपक्रम राबवणार असल्याचे सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. तर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमच्या माध्यमातून सन २०१८ पासून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा डॉ. विद्या काळे यांनी आढावा घेतला. रोटरीच्या माध्यमातून पंचगंगा हॉस्पिटलसाठी बेबी वॉर्मर मशिन, बेड, महिलांसाठी स्वच्छतागृह, ऑपरेशन थिएटरमधील पार्टीशन आणि विविध साहित्य उपलब्ध करून दिल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. रोटरीच्या सहकार्यामुळे हॉस्पिटलच्या सुविधांमध्ये भर पडली आहे आणि पंचगंगा हॉस्पिटलला राज्यातील प्रथम क्रमांकाचे हॉस्पिटल म्हणून गौरव प्राप्त झाल्याचे डॉ. काळे यांनी नमुद केले. यावेळी सौ. अरूंधती महाडिक आणि डॉ. तेजश्री तहसिलदार यांच्यासह मान्यवरांनी हॉस्पिटलची पाहणी करून, प्रसुती झालेल्या मातांची विचारपूस केली. तसेच सर्व मातांना ड्रायफु्रटस्ची पाकीटे देण्यात आली. यावेळी सचिन कुलकर्णी, विश्वजित जाधव, संभाजी जाधव, राहूल राबाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
