कोल्हापूर : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त कोल्हापूर’ अभियानांतर्गत आज शिवाजी विद्यापीठात व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रील मेकिंग व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना समाज कल्याण समिती सभापती श्रद्धा गायकवाड यांच्या हस्ते नशामुक्ती चॅम्पियन ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. संतोष निंबाळकर यांचे विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.
कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, समाज कल्याण समिती सभापती श्रद्धा गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. कबीर खराडे तसेच राष्ट्रीय विकास विभागाचे संचालक डॉ. एस. जी. घाणे उपस्थित होते. जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. शिवाजी विद्यापीठाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अभिजित गाताडे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी जनजागृतीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
