कोल्हापूर : मुरगुड येथील पुलाच्या बांधकाम विषयाच्या अनुषंगाने तसेच जिल्ह्यातील विविध प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनुक्रमे सार्वजनिक बांधकाम मंत्री त्याचबरोबर पुनर्वसन आणि जलसंधारण मंत्र्यांकडे मंत्रालय स्तरावर आगामी महिन्याभरात बैठक लावणार असल्याचे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले .

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात मंत्री मुश्रीफ यांनी आज विविध प्रश्नांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी हेमंत निकम,राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, कागल तहसीलदार अमरदीप वाकडे, तहसीलदार हनुमंत म्हेत्रे, एमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंता नजीर नायकवडी प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री मुश्रीफ म्हणाले,गारगोटी ते नागणवाडी या सिमेंट रस्त्याचे काम भडगाव रोडवर सुरू असल्याने या परिसरातील मुख्य जलवाहिन्या फुटल्या आहेत.त्यामुळे सुमारे अडीचशेहून अधिक नळ कनेक्शनधारक बाधित झाले आहेत.ऐन पावसाळ्यात गडहिंग्लज शहरातील पाणी प्रश्न बिकट झाला आहे. या प्रश्नाची संबंधित ठेकेदाराने त्वरित सोडवणूक करावी तसेच दूधगंगा प्रकल्पामध्ये विस्थापित झालेल्या हजारो धरणग्रस्तांचे पुनर्वसन होऊन अनेक वर्ष लोटली असली तरी त्यांचे आजही अनेक मूलभूत आणि महसुली प्रश्न प्रलंबित आहेत.
त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत असून जिल्हा प्रशासनाने त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्यपूर्वक बघून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. कुरनूर येथील पुरग्रस्तांच्या प्लॉटिंग संदर्भात पाटबंधारे विभागाने संबंधित ठिकाणची पाहणी करून एका महिन्यात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा असे निर्देश दिले .
यावर प्रकल्पग्रस्तांच्या तसेच बाधितांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक लवकरात लवकर करण्याला जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न राहील असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या , मुरगुड येथील पुलाचे बांधकाम, पिंपळगाव खुर्द येथील लाभार्थ्यांचे सात बाऱ्यावर नाव नोंदणी करणे, कुरनूर येथील पूरग्रस्तांचे प्लॉटिंग करणे त्याचबरोबर गडहिंग्लज शहरातील पाणी प्रश्नाच्या अनुषंगाने विविध समस्यांचा आढावा घेतला.
तत्पूर्वी दूधगंगा धरणग्रस्त कोल्हापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सागर माने यांनी , सर्व प्रकल्पग्रस्तांच्या नोंदी सातबाराला घेण्यात याव्यात त्याचबरोबर प्रत्येक लाभधारकास प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे.तसेच सर्व धरणग्रस्तांचे सिटी सर्व्हे पूर्ण करून नकाशाप्रमाणे वसाहतीच्या हद्दी निश्चित कराव्या अशी मागणी केली. यावेळी गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश सलवादे ,बांधकाम सभापती रामगौज पाटील,कागल येथील भूमी अभिलेख उप अधिक्षक पल्लवी उगले , पिटर डिसूजा यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते .
