मुंबई:वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई येथील अत्याधुनिक मध्यवर्ती सभागृह, नूतनीकरण करण्यात आलेल्या मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र विभागाचे तसेच अत्याधुनिक सीबीसीटी (CBCT) यंत्रणेचे संयुक्त लोकार्पण करण्यात आले. याच कार्यक्रमात सेंट जॉर्ज रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधांचे उद्घाटन व लोकार्पणही करण्यात आले.

राज्य शासनाच्या सुमारे ₹१० कोटी निधीतून श्रेणीवर्धित करण्यात आलेले शासकीय दंत महाविद्यालयाचे ४८० आसनक्षमतेचे अत्याधुनिक मध्यवर्ती सभागृह आधुनिक ध्वनीव्यवस्था, अत्याधुनिक ऑडिओ-व्हिज्युअल प्रणाली, उच्च दर्जाची प्रोजेक्शन व्यवस्था, व्यावसायिक प्रकाशयोजना, वातानुकूलन, स्वतंत्र ग्रीन रूम तसेच आधुनिक स्वच्छतागृहांनी सुसज्ज आहे. हे सभागृह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषद, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.
याच कार्यक्रमात जिल्हा नियोजन समितीच्या सुमारे ₹२.६० कोटी निधीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र विभागाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच; सुमारे ₹८४ लाख किंमतीच्या अत्याधुनिक सीबीसीटी (Cone Beam Computed Tomography) यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे रुग्णांचे अधिक अचूक निदान, उपचार नियोजन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अत्याधुनिक निदान तंत्रज्ञानाचे दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे.
यावेळी सेंट जॉर्ज रुग्णालयातील जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वॉर्ड क्रमांक १० चे उद्घाटन, अत्याधुनिक हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी (HBOT) केंद्राचे उद्घाटन, २४ तास डायलिसिस सेवेचा शुभारंभ तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या CSR उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या अत्याधुनिक कार्डियाक अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. डिंपल पडावे, सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर, वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, विद्यार्थी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी राज्य शासन आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन क्षेत्रात अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या सुविधा रुग्णांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा, विद्यार्थ्यांना आधुनिक प्रशिक्षण आणि संशोधनासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
=======
