कोल्हापूर : कोल्हापूरचे सुपुत्र, माजी राज्यपाल आणि शिक्षणमहर्षी कै. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दुःख व्यक्त करून आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली आहे.

यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, “त्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांनी व्यावसायिक शिक्षणाबत धोरण आखल्यानंतर महाराष्ट्रात त्यासाठी फार मोठा पुढाकार कै. डी. वाय. पाटीलसाहेबांनी घेतला. गोरगरिबांच्या समाजातील मुले डॉक्टर आणि इंजिनियर व्हावीत, हे स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवले.”
ते पुढे म्हणाले, “राज्यपाल म्हणून त्यांनी त्रिपुरा आणि बिहार या दोन राज्यांमध्ये उल्लेखनीय काम केले. ते अतिशय धाडसी आणि जिद्दी स्वभावाचे होते. एखादी गोष्ट मनावर घेतली की जिद्दीने पूर्ण करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. अशा एका थोर नेत्याला आणि समाजसेवकाला आपण मुकलो आहोत.”
कै. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
