सुळकुडमध्ये विजेची तार चिकटल्याने ठार झालेल्या कु. शर्विल महादेव याच्या घरी मंत्री हसन मुश्रीफ यांची सांत्वनपर भेट           नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने ५१ हजारांची मदत

सुळकुड:सुळकुड ता. कागल येथील श्रीकृष्ण तरुण मंडळ गल्लीतील कु. शर्विल सागर महादेव या ९ वर्ष वयाच्या बालकाचा खेळताना विजेच्या ११ केव्ही उच्च दाब क्षमतेच्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. काल रविवारी दि. दोन ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमाराला ही दुर्घटना घडली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कु. शर्विलच्या घरी सांत्वनपर भेट दिली. या भेटीत त्यांनी नामदार हसन साहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने महादेव कुटुंबियांना रू. ५१ हजार रुपयांचा तातडीच्या मदतीचा धनादेश दिला.

 

 

 

मुश्रीफ या कुटुंबीयांच्या घरी पोहोचताच कु. शर्विलच्या कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. कुटुंबीयांच्या या आक्रोशाने मंत्री श्री. मुश्रीफही भावनाविवश झाले व त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी, येथील श्रीकृष्ण गल्लीतून ११ केव्ही उच्चदाब क्षमतेची तार महावितरणने उघड्यावरच ठेवलेली आहे. कुमार जीवन शिक्षण विद्यामंदिरात इयत्ता चौथीत शिकत असलेला नऊ वर्षाचा कु. शर्विल आणि त्याचे सवंगडी एका इमारतीवर लपंडाव खेळत होते. खेळतानाच कु. शर्विलचा या उच्च दाब क्षमतेच्या तारेला स्पर्श झाला आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यामागे आई- वडील, बहीण व आजोबा असा परिवार आहे.

 

यावेळी महादेव कुटुंबीय व ग्रामस्थांशी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले की, या प्रकरणी निष्काळजीपणा व गलथानमध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करू आणि महादेव कुटुंबीयांना जास्तीत- जास्त मदत मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करू.

 

*दोषींवर कठोर कारवाई करा – संतप्त ग्रामस्थांची मागणी*

येथील श्रीकृष्ण तरुण मंडळ गल्लीत ११ के. व्ही. उच्च दाब क्षमतेची तार महावितरणने उघड्यावरच सोडलेली आहे. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी भेट देताच महावितरणच्या या गलथान आणि जीवघेण्या कारभाराबद्दल ग्रामस्थांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी श्री. मुश्रीफ यांच्याकडे केली. यावेळी श्री. मुश्रीफ यांनी महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी प्रयत्न करू असे स्पष्ट केले. तसेच; तहसीलदार श्री. अमरदीप वाकडे व महावितरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या व जास्तीत- जास्त भरपाई या कुटुंबीयांना देण्याच्या सूचना केल्या.

 

यावेळी क्रांतीकुमार पाटील, गोटू देशपांडे, भीमगोंडा पाटील, नितीन कांबळे, सुरेश घाटे, सुधीर महादेव, अनिल महादेव आदी प्रमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

🤙 8080365706