वाकरेत छ. शिवाजी महाराज स्व समाधान शिबिर उत्साहात

कोल्हापूर:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून  विठाई-चंद्राई मल्टीपर्पज हॉल, वाकरे, ता. करवीर येथे आ . चंद्रदीप नरके यांच्या अध्यक्षतेखाली ‘छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न झाले.

 

‘शासन आपल्या दारी’ या भावनेतून नागरिकांच्या समस्या त्यांच्या गावातच, त्यांच्या जवळच सोडविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात विविध शासकीय योजना, महसूल विभागाशी संबंधित सेवा, दाखले व प्रमाणपत्रे तसेच नागरिकांच्या विविध कामांसाठी आवश्यक मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले.

 

यावेळी आ.चंद्रदीप नरके यांनी विविध स्टॉल्सना भेट देत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. शासनाच्या योजना आणि लोककल्याणकारी सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, हेच लोकप्रतिनिधी म्हणून आमचे सर्वोच्च कर्तव्य आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत आणि त्यांची कामे सुलभ, पारदर्शक व जलदगतीने मार्गी लागावीत, यासाठी प्रशासन आणि जनतेमध्ये प्रभावी समन्वय निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न राहील.

 

या लोकाभिमुख उपक्रमाला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच आमच्या कामाची खरी पावती आहे. करवीरच्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहणे, हीच आमची बांधिलकी! असे मत आ. नरके यांनी व्यक्त केले.

 

प्रांताधिकारी मोसमी चौगुले, करवीर तहसीलदार स्वप्निल पवार, गगनबावडा तहसीलदार रूपाली सूर्यवंशी, शिवसेना महिला प्रमुख शुभांगी पोवार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महसूल विभागातील सर्व अधिकारी नागरिक आदी उपस्थित होते.

 

 

🤙 8080365706