कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील बोगस सभासद नोंदणी प्रकरणात प्रशासक मंडळाने मोठी पावले उचलली आहेत. संघाशी संबंधित 410 दूध संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

गोकुळच्या प्रशासक मंडळाच्या 10 जुलै रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या आदेशानुसार कार्यकारी संचालकांनी संबंधित संस्थांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे.
या संस्थांनी नियमबाह्य पद्धतीने सभासद नोंदणी केल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. त्यामुळे या संस्थांना 22 जुलैपर्यंत लेखी खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
खुलासा समाधानकारक न आल्यास संबंधित संस्थांचे सभासदत्व रद्द केले जाऊ शकते, असे प्रशासकांनी स्पष्ट केले आहे.
मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर ही तपासणी सुरू करण्यात आली होती. आता नोटीसमुळे गोकुळच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
