कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने विश्रांती घेत कडक ऊन पडल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने धरणांतील आवक मंदावली, तर पंचगंगा नदीचीपाणीपातळी अवघी १४.३ फुटांवर आली असून, नदीकाठावर चिखल साचल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यातील २२ बंधारे खुले झाले असून, केवळ ५ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात अद्याप चार ठिकाणी वाहतूक बंद आहे. मात्र, वाठार-इचलकरंजी मार्ग सहा दिवसांनी सुरू झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर रविवारी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली. दिवसभर कडक ऊन पडल्याने शेतकरीही शेतीच्या कामासाठी शेतात उतरल्याचे चित्र दिसून आले. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याचा वेग मंदावला आहे. अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत शून्य मिमी पावसाची नोंद झाली आहे.
