कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रारूप यादीकडे दूध संस्थांच्या नजरा लागल्या आहेत. सध्या दुबार ठरावधारकांची सुनावणीची प्रक्रिया सुरू असली तरी अवसायनातील संस्थांबाबत २१ जुलैला कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होत आहे. त्यानंतरच प्रारूप यादी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे.

‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी सभासद संस्थांकडून प्रतिनिधींच्या नावाचे १ जुलैला ठराव दाखल झाले आहेत. ज्यातील ५६ दुबार ठरावधारकांची सुनावणी सुरू झाली आहे. शुक्रवारी १५ संस्थांची सुनावणी पूर्ण झाली. सोमवार व मंगळवारी उर्वरित संस्थांना बोलावले आहे. त्यानंतर, ठरावावर आलेल्या हरकतदारांना बोलावले जाणार आहे. या आठवड्यात सुनावणी पूर्ण होऊन प्रारूप यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. पण, अवसायनात काढलेल्या संस्थांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली आहे. त्यावर, २१ जुलैला सुनावणी होणार आहे. येथे काय निकाल लागतो पाहणे महत्त्वाचे आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ९० दिवसात ‘गोकुळ’ची निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. ही मुदत ३ ऑगस्टला संपत असल्याचे त्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झालेली नाही. प्रारूप यादीवर हरकती, सुनावणी मग अंतिम यादी जाहीर होणार. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे ३ ऑगस्टपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरू होणेही अवघड आहे.
