नागपूर : राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाण पुलांच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून, रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

वर्धमाननगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी रस्ता उड्डाण पूल तसेच राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड [महारेल] यांनी विकसित केलेल्या या प्रकल्पाच्या लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर, महापौर श्रीमती निता ठाकरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी, महारेलचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल, दयाशंकर तिवारी, महानगरपालिकेचे नगरसेवक”, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
