कोल्हापूर : महानगरपालिकेच्या विविध विभागांकडे पडून असलेले निरुपयोगी व स्क्रॅपपात्र साहित्य विक्री करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. त्यानुसार कार्यशाळा विभागाकडील निर्लेखनयोग्य साहित्याचा तपशील तयार करून त्याची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील बंद अवस्थेतील व स्क्रॅपपात्र साहित्याचे वर्गीकरण करून त्यांची यादी तयार करण्यात येत आहे. तसेच संबंधित साहित्याच्या नोंदी, वजन, फोटो आदी माहिती संकलित करून शासन मान्यताप्राप्त मूल्यांकन अधिकाऱ्यांकडून त्याचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्यानंतर शासन अधिकृत लिलावधारकांकडून तपासणी करून निर्लेखनाची कार्यवाही तातडीने करण्यात येणार आहे.
प्राथमिक टप्प्यात आयुर्मान संपलेली एकूण 28 वाहने स्क्रॅप पात्र ठरविण्यात आली आहेत. यामध्ये 1 व्हॅक्युम व्हॅन, 7 ट्रक, 3 जेसीबी, 5 ट्रॅक्टर, 4 ट्रॉली, 1 ट्रेलर, 3 कार आणि 4 जीप यांचा समावेश आहे. याशिवाय कार्यशाळा विभागातील नादुरुस्त स्पेअर पार्ट्स, स्टील मटेरियल तसेच आरोग्य विभागातील स्क्रॅप कंटेनरच्या विक्रीसाठी स्थायी समितीची मान्यता मिळाली आहे. सध्या या साहित्याचे वजन व मोजमाप घेण्याचे काम पूर्ण झाले असून गव्हर्नमेंट व्हॅल्युएटरकडून मूल्यांकन प्रक्रिया सुरू आहे. मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार साहित्याचे लॉट तयार करून जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर ई-ऑक्शनद्वारे स्क्रॅप विक्री केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे कार्यशाळा विभागाकडील सुमारे 40 हजार स्क्वेअर फूट म्हणजेच जवळपास 1 एकर जागा मोकळी होणार असून महानगरपालिकेला अंदाजे 2 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. या प्राप्त होणा-या महसूल मधून कार्यशाळा विभागाकडे नविन यंत्रसामुग्री खरेदी करण्यात येणार आहे.
