गोकुळ निवडणूक प्रकरणात नवा वाद; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील शब्द गाळल्याचा गंभीर आरोप

कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ दूध संस्था यांच्या वतीने गोकुळ दूध संघ निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले असून, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या पत्रव्यवहारावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

 

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव श्री अशोक गाडे यांनी गोकुळ दूध संघ निवडणुकीसंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने ९० दिवसांत निवडणुका घेण्याबाबत दिलेल्या आदेशाबाबत संभ्रम असल्याचे नमूद करत प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग यांच्याकडे मार्गदर्शन मागवले आहे. मात्र, या पत्रातील परिच्छेद क्रमांक ३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील परिच्छेद क्रमांक ८ मधील “from today” हे महत्त्वाचे शब्द जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
श्री स्वामी समर्थ दूध संस्था यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अपूर्ण संदर्भ देऊन विधी व न्याय विभागाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, “from today” या शब्दांमुळे निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची मुदत स्पष्ट होत असताना ते शब्द गाळल्याने आदेशाचा अर्थ बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय निर्माण होत आहे.
संस्थेने हा प्रकार मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचा दावा केला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्यासह फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही संस्थेकडून देण्यात आली.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, न्यायालयीन आदेशातील महत्त्वाचे शब्द वगळून शासनाच्या विधी व न्याय विभागासमोर अपूर्ण माहिती ठेवणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून, यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गोकुळ दूध संघ निवडणूक प्रक्रियेभोवती आधीच राजकीय आणि प्रशासकीय वातावरण तापलेले असताना या नव्या आरोपांमुळे प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. आता या तक्रारीनंतर शासन, विधी विभाग आणि निवडणूक प्राधिकरण यांची भूमिका काय राहणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

🤙 8080365706