कोल्हापूर : जिल्ह्यात ‘ई-ऑफिस’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि ‘गतिमान प्रशासन’ संकल्पनेला बळकटी देण्यासाठी महसूल विभागाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून संगणक व अत्याधुनिक डिजिटल साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत क्षेत्रिय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या नियमित योजनेतून १ कोटी रुपये खर्चून हे साहित्य खरेदी करण्यात आले असून, त्याचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभाग, अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे साहित्य वितरीत करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ७५ संगणक संच, ५० प्रिंटर्स, २ कलर प्रिंटर्स, ११ स्कॅनर्स, १ झेरॉक्स मशीन आणि ७८ यूपीएस यांसारख्या आधुनिक उपकरणांचा समावेश आहे. या साहित्यामुळे महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजात सुसूत्रता येणार असून फाईल्सचा प्रवास अधिक वेगवान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशासकीय कामकाजाला तंत्रज्ञानाची जोड देण्याचे आवाहन केले. लोकांना सुलभ आणि जलद सेवा मिळावी यासाठी प्रशासनाला भौतिक सुविधा व डिजिटल साहित्य मोठ्या प्रमाणावर दिले आहे. आता या उपकरणांच्या सहाय्याने ई-ऑफिस प्रणालीचा वापर करून प्रशासनाने अधिक गतिमानतेने काम करावे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास खासदार शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोक माने यांनीही उपस्थित राहून महसूल प्रशासनाच्या या डिजिटल क्रांतीचे कौतुक केले. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रातिनिधीक स्वरूपात तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष साहित्य सुपूर्द करून या वाटप मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
०००००
