मुगळी:लोककला ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारताच्या संस्कृतीचा फार मोठा हिस्सा आहे. महाराष्ट्र सरकारच्या विठाबाई भाऊ मांग- नारायणगांवकर लोककला कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून लोककलाकारांना राजाश्रय मिळवून देऊ, असा दिलासा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे पाठपुरावा करून लोक कलाकारांचे प्रश्न मार्गी लावू, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाच्या मुगळी ता. कागल येथील उपशाखेच्यावतीने कै. वस्ताद शाहीर सुबराव धोंडी पाटील (शक्तिवाले) रा. मुगळी यांचे स्मरणार्थ आयोजित लोककलाकार महोत्सवात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य सरकारने लोक कलाकारांच्या कल्याणासाठी विठाबाई भाऊ नारायणगांवकर लोककला कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. लोक कलाकारांसाठी मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जाते. तसेच; लोक कलाकारांचे सर्व प्रश्न आणि समस्या निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहू.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाचे अध्यक्ष विलास पाटील यांचे काम अत्यंत तळमळीने सुरू आहे. त्यांना राज्य पातळीवर लोक कलाकारांचे प्रश्न मोठ्या व्यापक प्रमाणात सोडवण्यासाठी लोक कलाकारांच्या महाराष्ट्र राज्य समितीवर काम करण्याची संधी देण्यासाठी प्रयत्न करू.
*टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर…….!*
मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात संत एकनाथ महाराज यांच्या ‘अग बया बया विंचू चावला…,’ या भारुडासह स्वर्गीय प्रल्हाद शिंदे यांच्या ‘पाऊले चालती पंढरीची वाट…..,’ या सुप्रसिद्ध अभंगाचा व लोक कवी स्वर्गीय विठ्ठल उमप यांच्या ‘ जांभूळ आख्याना’ उल्लेख केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती काहीली….’ या छक्कडचा उल्लेख करताच उपस्थित लोककरांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात भाषणाला दाद दिली.
या लोककला महोत्सवामध्ये लोकशाहीरी, भजन, कीर्तन, गायन, लेझीम, दांडपट्टा, पिंगळा, भारुड, गोंधळी, डवरी, तबला वादन, ढोलकी वादन, श्री. रेणुका गायन, हलगी वादन, धनगरी ओव्या, ढोल पथक, ताशा पथक अधिक क्षेत्रातील लोककलाकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिल्पाताई खोत, पंचायत समितीच्या सदस्या श्रीमती सुनिता राजाभाऊ माळी, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, मुगळीच्या सरपंच सौ. मेघाताई पाटील, उपसरपंच उदयबाबा पसारे, हमिदवाडा साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र सांगले, कोल्हापूर जिल्हा लोककला संघाचे अध्यक्ष विलासराव पाटील, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य बाबासाहेब सांगले, शंकर कुणकेकर, अनिता कांबळे, लिलाबाई कांबळे, बाळासाहेब कुणकेकर, संजय पाटील, सुदाम पाटील, रामचंद्र कुणकेकर, शशिकांत येजरे, मुकुंद पाटील, विलास पाटील, धोंडीराम पाटील, अनिता मगदूम, धोंडीराम मगदूम, राजाराम कोपटकर आदी प्रमुख उपस्थित होते.
