कोल्हापूर : महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात करण्यात आला. या मोहिमेद्वारे 14 वर्षे पूर्ण व 15 वर्षांखालील किशोरवयीन मुलींना एचपीव्ही लस मोफत देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या शुभहस्ते तर आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

भारतामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून 2022 च्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 34,805 महिलांचा मृत्यू या आजारामुळे झाला आहे. या आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी वेळेत लसीकरण करणे हा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. त्यामुळे पात्र लाभार्थी मुलींना ही लस महापालिकेमार्फत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.
ही लस पूर्णपणे सुरक्षित असून पात्र लाभार्थी मुलींना एकच डोस देण्यात येणार आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामार्फत सुट्टीचे दिवस वगळता दररोज सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत ही लस मोफत दिली जाणार आहे. ही मोहीम पुढील तीन महिने सुरू राहणार असून पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, नगरसेवक विनायक फाळके, अमर समर्थ, नगरसेविका निलिमा पाटील, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. संजना बागडी, डॉ. योगिता भिसे तसेच सावित्रीबाई फुले प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
