कोल्हापूर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे नियोजन केले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.

मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण या मोहिमेत सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या घटसर्प (Haemorrhagic Septicaemia) व फऱ्या (Black Quarter) यांसारख्या घातक आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीची गुणवत्ता टिकून राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. लसीचा प्रभाव उत्तम राहण्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवण्यात आले असून राज्यस्तरापासून ते थेट ग्रामीण भागातील उपकेंद्रांपर्यंत लस पोहोचवताना आवश्यक तापमान राखले जाईल, यासाठी अद्ययावत कोल्ड बॉक्सचा वापर केला जात आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी विभागामार्फत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्हा व तालुका पातळीवर आवश्यकतेनुसार लसींचा पुरेसा साठा आधीच वितरित करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली असून, ती प्रत्यक्ष गावागावांत व गोठ्यांपर्यंत पोहोचून ‘डोअर स्टेप’ पद्धतीने लस टोचणी करत आहेत.
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे लसीकरणाचे पारदर्शक डिजिटल ट्रॅकिंग होय. प्रत्येक पशुधनाला लस टोचल्यानंतर त्याची नोंद ‘भारत पशुधन प्रणाली’ (NDLM Portal) या केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर रिअल-टाइम (तात्काळ) करणे आवश्यक आहे. पशुधनाचे टॅगिंग (१२ अंकी बिल्ला) करूनच ही नोंदणी केली जावी, जेणेकरून मोहिमेच्या प्रगतीवर थेट देखरेख ठेवता येईल व बोगस नोंदींना आळा बसेल, अशा सूचना आयुक्त डॉ. पाटील यांनी सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
0000
