चॅनेल बी च्या वर्धापन दिनानिमित्त खासदार महोत्सवांतर्गत घेतलेल्या खुल्या निसर्ग चित्र स्पर्धेला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर:चॅनेल बी च्या वर्धापनदिनानिमित्त खासदार महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम आणि स्पर्धा सुरू आहेत. या अंतर्गत खुली निसर्ग चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. एकाहून एक सरस निसर्ग चित्र साकारत चित्रकारांनी आपल्या गुणवत्तेचं आणि कौशल्याचं प्रदर्शन घडवलं. स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा सायंकाळी पार पडला. त्यामध्ये मिरजेच्या अनंत भोगटे, कोल्हापूरच्या श्रध्दा चराटकर आणि शुभम दरगडे यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
चॅनेल बी च्या वर्धापन दिनानिमित्त खासदार महोत्सव सुरू आहे. या अंतर्गत खुली निसर्ग चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला चित्रकारांचा उदंड प्रतिसाद मिळाला. भवानी मंडप, टाऊन हॉल आणि पंचगंगा नदी काठावर ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत सहभागी होवून तिन्ही ठिकाणी चित्रकारांनी एकाहून एक सरस आणि अभिजात कौशल्याचं प्रदर्शन घडवणारी चित्रं साकारली. खुल्या वातावरणात आणि निसर्गाच्या सहवासात चित्रकारांची प्रतिभा अधिकच खुलली होती. दुपारपर्यंत चाललेल्या या स्पर्धेला स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद देत, स्पर्धा यशस्वी केली. सायंकाळी भागीरथी महिला संस्थेच्या ताराराणी चौकातील कार्यालयात बक्षिस वितरण सोहळा पार पडला. चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, ख्यातनाम चित्रकार विजय टिपुगडे, नागेश हंकारे, प्रा. अभिजीत कांबळे, बबन माने यांच्या उपस्थितीत विजेत्या चित्रकारांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिरजेच्या नवकृष्ण व्हॅली कला महाविद्यालयाच्या अनंत विजयकुमार भोगटे यांनी पटकावला. तर शिवाजी विद्यापीठाच्या श्रध्दा देवदत्त चराटकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. विवेकानंद कॉलेजच्या शुभम संजय दरगडे यानं तृतीय क्रमांक मिळवला. दळवीज आर्ट इन्स्टिटयुटच्या मयूर मंगेश कोंडुसकर आणि पन्हाळयाच्या संजीवन ग्रुप ऑफ आर्टसचा राजवर्धन सुरेश चव्हाण यांना उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आली. कोल्हापुरातील चित्रकारांमध्ये मोठी क्षमता आहे. इथली अनेक चित्रं आणि चित्रकार जगप्रसिध्द आहेत. नव्या पिढीच्या कलाकारांनी उत्तमोत्तम चित्रं साकारली तर खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून ती चित्रं दिल्लीपर्यंत पोचवता येतील, असं सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितलं. तर विजय टिपुगडे यांच्यासह परीक्षकांनी नव्या पिढीच्या चित्रकारांना चित्रकलेबाबत कानमंत्र दिला. दरम्यान चित्रकारांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल चित्रकारांनी महाडिक परिवार आणि चॅनेल बी प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

🤙 8080365706