कोल्हापूर महापालिकेत महायुतीचाच महापौर होईल कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

कागल:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुती म्हणून त्यागाचीही तयारी ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भाने कागलमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे मैदान लागलय, बिगुल वाजलय. महायुतीची फळे चाखायची असतील तर महायुतीच्या नियमातच राहावे लागेल. उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोणीही नाराज होऊ नका. इच्छुक असूनही ज्यांना थांबावे लागेल, त्या सर्वांचा बॅकलॉग आपण भरून काढू .

श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, तुम्हा कार्यकर्त्यांच्यामुळेच कागल तालुक्यातून सहावेळा आमदार होण्याचा मान मिळाला आणि मंत्रीपदाची संधी मिळाली. तुम्ही नसता तर महाराष्ट्राच्या नकाशावर हसन मुश्रीफ उदयासच आला नसता. तुमच्यामुळेच ही यशस्वी वाटचाल करू शकलो . मतदारसंघाचा कायापालट करण्याचे काम मी केले आहे . 750 हुन अधिक देवालयांचा जिर्णोद्धार करण्याचे भाग्य मला मिळाले. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे. गाफील राहू नका अन्यथा पश्चाताप करावा लागेल. मी मंत्री असल्यामुळे माझ्या मतदारसंघात काहीही झाले तर त्याचा परिणाम वरिष्ठ पातळीवर मुंबईत होतो. येणाऱ्या निवडणुकीत हातात हात घालून आपली गल्ली, गाव सांभाळा, परिणाम चांगले दिसतील. आपल्या कामाची नोंद मी स्वतः व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही नक्की घेईल.
त्यागाची तयारी ठेवा….!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आपण महायुतीमध्ये आहोत. युतीची बैठक रविवारी दि. १८ होणार आहे. माजी आमदार संजयबाबा घाटगे व समरजीतसिंहराजे घाटगे यांना काही जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे, नाराज न होता त्यागाचीही तयारी ठेवा.

धर्मसंस्थेला संरक्षण….!
गडहिंग्लजचे नूतन नगराध्यक्ष महेश तुरबतमठ म्हणाले, नामदार हसनसाहेब मुश्रीफ हे जनसामान्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी ३०-३५ वर्षांची पुण्याई ऊभी केली. शेकडो मंदिरे, आश्रम, मठ अशा धर्मस्थळांची उभारणी करून त्यांनी धर्मसंस्थेलाही संरक्षण आणि पाठबळ दिले आहे.

कार्यक्रमास गोकुळचे संचालक युवराज पाटील, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, सतीश पाटील- गिजवणेकर, वसंतराव धुरे, नगराध्यक्षा सौ. सविता माने, शशिकांत खोत सौ. शितल फराकटे, बाळासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कार्यक्रमात कागलच्या नगराध्यक्षा सौ. सविता प्रताप उर्फ भैय्या माने, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, उपनगराध्यक्ष महेश सलवादे यांच्यासह नूतन नगरसेवक व भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या अग्निवीर जवानांचा सत्कार मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

स्वागत विकास पाटील यांनी केले. प्रास्ताविक भैय्या माने यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार संजय चितारी यांनी मानले.

🤙 8080365706