मुंबई : मंत्रालयात स्मार्ट प्रकल्पासंदर्भात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट प्रकल्प) तातडीने मार्गी लावण्याची मागणी मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.
तसेच, सर्वसामान्य शेतकऱ्यांना उद्योजक बनवणाऱ्या, आणि त्यांना प्रगतीच्या नव्या टप्प्यावर नेणाऱ्या या योजनेतील किचकट अटी शिथिल करून, शेतकऱ्यांना उद्योग उभारण्यासाठी अधिक प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती हिट त्यांनी केली.
या मागणीच्या अनुषंगाने कृषीमंत्री .माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना कालमर्यादा ठरवून कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत एकूण 1200 युनिट्स मार्च 2027 पर्यंत पूर्ण करायचे आहेत, यासाठी याआधीच सर्व प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश कृषिमंत्र्यांनी दिले.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी, राज्यातील शेतकरी उद्योजक व कृषी विभागाचे राज्य तसेच जिल्हा स्तरीय अधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक लवकरात लवकर आयोजित करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
शेतकरी नवउद्योजकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी, तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री महोदयांनी दिले.
या बैठकीस मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्यासह राज्यातील विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.