सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजना सामान्य लोकांपर्यंत माध्यमांद्वारे प्रभावीपणे पोहोचवा –   मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांची, उपक्रमांची व उपलब्ध सेवा सुविधांची माहीती वृत्तपत्रे व विविध माध्यमांद्वारे  लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, असे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाशआबिटकर यांनी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत दिले.

राज्यात आरोग्याच्या विविध योजना राबविण्यात येतात, विविध सोई सुविधा रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच #आरोग्यविभाग चांगले काम करीत आहे याचे माध्यमांद्वारे वृत्तांकन केले पाहिजे. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांचा त्वरित खुलासा करून वस्तुस्थिती मांडली पाहिजे, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी यांनी यासाठी सजग राहून कार्य करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

राज्यातील जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांची आढावा बैठक मुंबई येथे आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यात आरोग्य विषयक जनजागृती व प्रसिद्धी उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला.

ग्रामीण व अतिदुर्गम भागात राबविण्यात येणारे जनजागृती उपक्रम याविषयी माहिती घेऊन सदर उपक्रम अधिक चांगल्या प्रकारे कसे राबवता येतील यासाठी ही विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना करून जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांना माध्यमाद्वारे प्रभावी काम करता यावे यासाठी प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

या बैठकीला आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर, उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर, सहायक संचालक डॉ. संजय कुमार जठार तसेच सर्व जिल्ह्यातील जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545