मुंबई – धर्मादाय रुग्णालयातील रुग्णांना आकारण्यात येणारे दर, धर्मादाय रुग्णालयात आरोग्य मित्र नियुक्ती, सर्व शासकीय कर्मचारी, पोलिस विभागातील अधिकारी व बांधकाम कर्मचारी यांची वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती यावर चर्चा करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशआबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक आज घेण्यात आली.
राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा सर्वसमावेशक लाभ मिळावा यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात येणार आहेत आणि विविध विभागांच्या आरोग्य सेवा संदर्भातील निर्णय एकत्र करून प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात येईल, असे स्पष्ट मत आरोग्य मंत्री आबिटकर यांनी यावेळी व्यक्त केले.
या बैठकीस आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक, सचिव वीरेंद्र सिंह, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक कुंभार, उपमहानिरीक्षक श्री. प्रदीप शिखरे, उपसचिव श्री. अरुण जोशी, विधी व न्याय विभाग, धर्मादाय आयुक्तालय व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची यंत्रणा सशक्त करून नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावे, यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध आहे, अशी ग्वाही यावेळी आरोग्य मंत्र्यांनी दिली.