कोल्हापूर : एस.एस.सी./एच.एस.सी. परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक बदलाबाबत ब्लॅक लिस्टमधील परीक्षा केंद्रावरील कर्मचा-यांची होणारी गैरसोय पाहता त्यांची अदलाबदल करताना त्यांना नजिकच्या परीक्षा केंद्रावर नियुक्ती करुन सहकार्य करावे. अशी मागणी शिक्षक भारती पुणे विभाग अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी लेखी निवेदनाद्वारे विभागीय सचिव / अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभाग यांच्याकडे केली आहे.
लेखी निवेदनातील आशय असा की,मागील पाच-दहा वर्षामध्ये ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी सापडली असेल अशा केंद्रांचा समावेश ब्लॅक लिस्टमध्ये केलेला आहे. अशा केंद्रावरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक व कर्मचारी यांची लांब लांब अंतरावरील परीक्षा केंद्रावर आपण नियुक्ती केलेली आहे. उदाहरणार्थ- साधना हायस्कूल गडहिंग्लज केंद्रावरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांना आपणाद्वारे ३५ ते ४० कि.मी. अंतरा-वरील हलकर्णी हे परीक्षा केंद्र दिले आहे.त्यामुळे पुढील अडचणी निर्माण होणार आहेत.४० कि.मी. अंतरावरील परीक्षा केंद्रावर जाणे हे महिला /पुरुष यांना येणे जाणे त्रासदायक होणार आहे.
पर्यवेक्षक मानधन आपणांकडून रु.२५/- दिले जाते. त्यामुळे येणे जाणेचा प्रवास खर्चाचा भुर्दंड संबंधितांवर बसणार आहे. इ.१० व इ.१२ वी ची परीक्षा ही सुमारे दीड महिना कालावधीची चालणार आहे. त्यामुळे इ.५ वी ते इ.९वी आणि इ.११ वी च्या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू शकते. तसेच सकाळी लवकर तीन तास घेवून पुन्हा दिलेल्या लांबच्या परीक्षा केंद्रावर जाणे अशक्य आहे.