पुणे : संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरीष महाराज मोरेयांनी देहू येथील निवासस्थानी आत्महत्या केली. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिरीष महाराजांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. याबाबत अद्याप अधिकची माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र, आज सकाळी बराचवेळ होऊनही त्यांनी दार उघडले नव्हते.
दार वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी आपल्या उपरण्याने खोलीत गळफास लावून घेतला. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे देहूगावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.
शिरीष महाराज मोरे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. शिरीष महाराज यांनी खोलीत एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. 20 दिवसांपूर्वीच शिरीष महाराज मोरे यांचा साखरपुडा झाला होता. नुकताच त्यांचा टिळा झाला होता. 20 फेब्रुवारीला रोजी मोरे यांचा विवाह होणार होता. ते उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे. त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. मात्र, यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. शिरीष महाराज मोरे हे अवघ्या 30 वर्षांचे होते. पुढील काही महिन्यांमध्ये त्यांचे लग्न होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. तुकाराम महाराजांचे (Sant Tukaram Maharaj) वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येच्या बातमीने देहूनगरीत एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचेनेतून त्यांनी आत्महत्येचे केल्याचे कळत असल्याचे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.