मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई महानगर प्रदेशातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा होण्याकरिता सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावे, महसूल व वन विभागांनी आवश्यक परवानग्या तातडीने देऊन भूसंपादन प्रक्रिया निश्चित वेळेत पूर्ण करावी. तसेच वन विभाग, एमएमआरडीए, सिडको यांनी परवान्यांसह अनुषंगिक बाबी जलद गतीने पूर्ण करून प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
यासोबतच मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढती पाण्याची मागणी महत्त्वाचा मुद्दा असल्याने जलसंपदा विभाग आणि संबंधित यंत्रणांनी शाई व सुसरी प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावी, एसटीपी प्रकल्पातील सांडपाणी औद्योगिक वापरासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) घ्यावे; तसेच या पाण्यावर अधिक प्रक्रिया करता येईल का, याचा सखोल अभ्यास करावा. मुख्य सचिवांनी यासंदर्भात एमआयडीसी आणि नगरविकास विभाग यांची संयुक्त बैठक घ्यावी. जुन्या पाईपलाईन्समुळे होणाऱ्या पाण्याच्या गळतीसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात व पुराचे वाहून जाणारे पाणी साठवण्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री गणेश नाईक, मुख्य सचिव यांच्यासह संबंधित विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व सचिव उपस्थित होते.