शरद पवार यांनी दिली सारथी कार्यालयास भेट

पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कार्यालयास शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी या संस्थेविषयी सविस्तर माहिती दिली. या संस्थेने २०२० सालापासून उत्तरोत्तर प्रगती साधलेली आहे. याबद्दल शरद पवार यांनी संस्थेचे संचालक व सर्व अधिकारी वर्ग यांचे मनापासून अभिनंदन केले . 

 

 

 

 

सारथी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवलेलं आहे. या संस्थेमार्फत कौशल्य विकास व इंडो जर्मन टूल रूम (IGTR) यांसारखे प्रशिक्षण दिले जाते. सोबतच गुणवंत मुला- मुलींना परदेशी शिक्षणासाठी ‘महाराजा सयाजीराव गायकवाड’ शिष्यवृत्ती दिली जाते.

‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ व बारामतीची ‘ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने सारथी संस्थेमार्फत शेतकऱ्यांसाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण, मधुमक्षिका पालन, रोजगार व स्वयंरोजगाराबद्दल माहिती, वाहनचालनाचे कौशल्य विकास अशा अनेक महत्वाच्या लोकोपयोगी योजना चालवल्या जातात. त्याचे दृश्य परिणाम आता जाणवू लागले आहेत, याचा विशेष आनंद असल्याचे शरद पवार यांनी म्हंटल.