मुंबई : जगातील अनेक देशांमध्ये हयुमन मेटा न्युमोनिया व्हायरस ( एचएमपीव्ही ) विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. आपल्या देशात आजपर्यंत एकून पाच रुग्ण कर्नाटक, तामिळनाडू व गुजरात या राज्यात आढळून आले. त्यापैकी एक रुग्ण पुर्णपणे बरा होवून घरी गेलेला आहे. उर्वरित रुग्ण बरे होत आहेत. हा आजार गंभीर नसून लहान मुलं, वृद्ध आणि इतर गंभीर आजर असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले, आयुष विभागाचे संचालक डॉ. रमन घुंगराळकर याबरोबरच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता दुरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, काही राज्यांमध्ये एचएमपीव्ही प्रकरणे आढळून आलेली आहेत. परंतू; आपल्या राज्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कारण; सरकारकडून लवकरच या परिस्थितीबद्दल सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे जारी करुन या रोगाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन आळा घालण्यात येईल.
राज्यात सद्यस्थितीत एकही एचएमपीव्हीचा रुग्ण आढळला नाही. सर्व अधिष्ठातांनी संभाव्य प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी औषधांसह ऑक्सिजन व आवश्यकता वाटल्यास विलगीकरण यासाठी तयारीत रहावे. अतिरिक्त व मुबलक औषधीसाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. हा रोग राज्यात पसरु नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे व अधिष्ठातांनी सतर्क राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द कराव्या.
या रोगासंबंधी मोठया प्रमाणावर जनजागृती करून नागरिकांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
प्रतिबंधात्मक उपाय व सतर्कतेचा एक भाग म्हणून नागरिकांना खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाक रुमालाने नाक व तोंड झाकण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. साबण आणि पाण्याने किंवा सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुणे, ताप – खोकला आणि शिंका अथवा सर्दी- पडश्यासारखी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे व वैद्यकीय सल्यानुसार औषधी, भरपूर पाणी पिणे आणि पौष्टिक आहाराचे सेवन केल्यामुळे या रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल.