पंचगंगा नदीपत्रातील साचलेला गाळ काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी-आ. राहुल आवाडे

कुंभोज -(विनोद शिंगे)
येथील पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ शेतकर्‍यांना घेऊन जाण्यासाठी देण्यासंदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी केेलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रदीर्घकाळापासून घुसमट होत असलेल्या पंचगगा नदी पात्राला लवकरच मोकळा श्‍वास मिळणार आहे.

 

इचलकरंजी शहरालगतच असलेल्या पंचगंगा नदीतून शहराला पिण्याचे पाणी पुरवले जाते. उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन नदीपात्रात एक बंधाराही घालण्यात आला आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून या नदीपात्रातील गाळ न काढल्याने त्याचबरोबर गणेशोत्सव काळात नदीपात्रात श्री मूर्तीचे विर्सजन मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने बंधार्‍याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. शिवाय नदीपात्राची खोली अत्यंत कमी झाल्याने गत काही वर्षापासून महापूराचाही धोका वाढत चालला आहे. त्यामुळे नदीपात्रात साचलेला गाळ काढण्याची नितांत गरज आहे. आणि हे काम उन्हाळ्यातच शक्य असल्याने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी माजी आमदार आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी सातत्याने लावून धरली आहे. लवकरच उन्हाळा सुरु होत असून याच काळात नदीतील गाळ काढणे सोपे जाणार असल्याने आमदार राहुल आवाडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे या संदर्भात तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती.

यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी, नदी पात्रातील गाळ काढला गेल्यास पात्राची खोली आणि रुंदी वाढून पाणीसाठा करता येणार आहे. पाणीसाठा होणार असल्याने शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची तीव्रता बर्‍याच प्रमाणात कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. महत्वाचे म्हणजे मळेभागासह गावभागाला सातत्याने भेडसावणारा महापूराचा धोकाही कमी होणार आहे. नदी पात्राची खोली अतिशय कमी असल्याने महापूरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नदी पात्रातील गाळ तातडीने काढून पात्राची खोली वाढविणे अत्यंत गरजेचे बनल्याचे सांगितले. तर उपस्थित अधिकार्‍यांनीही मते व्यक्त केली. त्यावर झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजी शहर व परिसरातील शेतकर्‍यांना पंचगंगा नदीपात्रातील गाळ नेण्यास परवानगी दिली आहे. ज्या शेतकर्‍यांना गाळ न्यायचा आहे त्यांनी तो स्वत:हून उपसा करुन नेण्याचा आहे.

या बैठकीस प्रांताधिकारी मौसमी चौगुले, महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अप्पर तहसिलदार सुनिल शेरखाने, जिल्हा खणीकर्म अधिकारी आनंद पाटील, सहा.भूवैज्ञानिक भूजल व सर्व्हे विकासचे श. न. निंबाळकर, कोल्हापूर पाटबंधारे मंडळ अधिक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, उपअधिक्षक एस. आर. पाटील, कोल्हापूर इरिगेशन उत्तर विभाग कार्यकारी अभियंता स्मिता माने, यांत्रिकी विभाग कार्यकारी अभियंता सु. म. बागेवाडी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कोल्हापूरचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पोवार, श्री. शिंदे, अमोल जरग, उदय गायकवाड, वैभव कोळेकर आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545