कुंभोज (विनोद शिंगे)
संजय घोडावत विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने (आय क्यू ए सी) विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी ‘फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी’ विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याचा उद्देश नव शैक्षणिक धोरण 2020 ची परिणामकारक अंमलबजावणी करणे हा होता.
या कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांना वर्गात अभ्यासामध्ये गुंतवून ठेवण्यासाठीच्या नव संकल्पना शिकून घेतल्या. त्यासाठी विविध व्युह-रचना आखल्या. त्यासाठी ‘फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी’ पद्धतीचा वापर कसा करावा याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. नाविन्यपूर्ण अध्यापन- अध्ययन प्रणाली राबवण्यासाठी, मूल्यांकन पद्धतीसाठी माहिती आणि तंत्रज्ञान साधनांचा प्रभावीपणे वापर कसा करावा याचे देखील प्रशिक्षण घेतले.
या कार्यशाळेत नव शैक्षणिक धोरण मसुदा समिती सदस्या व एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू प्रो. डॉ. वसुधा कामत, याच विद्यापीठाच्या एज्युकेशनल टेक्नॉलॉजी विभागाच्या प्रो.डॉ.जयश्री शिंदे, सोमय्या कॉलेज मुंबईच्या अनुश्री सुखी, डॉ. लॉली जैन, डॉ. तृप्ती राणे, डॉ.मनाली जोशी, आकांक्षा शर्मा यांनी सहभागी प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले.
यासाठी घोडावत विद्यापीठाच्या आय क्यू ए सी संचालक डॉ. रेवती देशपांडे आणि डॉ. विद्याराणी खोत यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. कुलगुरू प्रो.उद्धव. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन केले. सर्व डीन, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे ही कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. याबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.