कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सेवानिवृत्त माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांना शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. खराट यांचा पत्रकारिता विभागाशी अनेक वर्षांचा ऋणानुबंध होता. त्यांच्या निधनाने पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्राशी संबंधित घटकांची तसेच सत्यशोधक चळवळीची मोठी हानी झाल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

शोकसभेत अधिविभागप्रमुख डॉ. निशा पवार म्हणाल्या, डॉ. खराट यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अनेक वर्तमानपत्रांत विविध पदांवर काम केले. विद्यार्थीदशेपासूनच ते अभ्यासू होते. सत्यशोधक जलशांवर त्यांनी संशोधन केले. पुढे अनेक पुस्तके लिहिली. शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता विभागात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते सातत्याने येत राहिले.
विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर म्हणाले, डॉ. संभाजी खराट यांनी सत्यशोधक पत्रकारितेवर संशोधन करून नव्या पिढीसाठी मौलिक काम केले आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी हे संशोधन सुरुच ठेवले होते. मुंबईत मंत्रालयात असताना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. सदैव हसतमुख असणारे डॉ. खराट माणूस म्हणून अत्यंत नम्र, मितभाषी आणि कार्यमग्न होते. लातूर येथे झालेल्या सत्यशोधक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. त्यांच्या निधनाने सत्यशोधक चळवळीची मोठी हानी झाली आहे.
यावेळी डॉ. शिवाजी जाधव यांनी शोकप्रस्ताव मांडला. शोकसभेस पुणे येथील फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इस्टिट्यूटचे डॉ. प्रसाद ठाकूर, शैलेश कोरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.