कोल्हापूर:बेळगाव वर दावा सांगण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगावात विधिमंडळ अधिवेशन घेत आहे. या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी म. ए समितीने महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्यासाठी कोल्हापूर येथून ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आज (सोमवारी, दि .9)बेळगावच्या दिशेने चालले होते. त्यादरम्यान कोगनोळी येथील दूधगंगा नदी जवळ शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी अडवले.यावेळी “आम्हाला बेळगावात जायचे आहे, आम्हाला कोणीही अडवू शकत नाही” असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. यामध्ये संजय पवार, विजय देवणे ,सुनील मोदी आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बेळगाव वर आपला दावा सांगण्यासाठी कर्नाटक सरकार 2006 पासून बेळगावात विधिमंडळाचे अधिवेशन घेते. हे अधिवेशन बेकायदा असल्याचा आरोप करत व हे समितीने दरवेळी महामेळावा आयोजित करून प्रत्युत्तर दिले आहे. यावर्षी देखील या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्यासाठी कोल्हापुरातील शिवसैनिक जात असताना, कर्नाटक हद्दीत पोहोचल्यानंतर त्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील ठिय्या आंदोलन केले .पण महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना उठवले. शिवसैनिकांनी महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. तसेच कर्नाटक पोलिसांनी सीमा भागात नाकाबंदी केली आहे.
बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी शहरातील पाच ठिकाणी सोमवारी सकाळी सहा ते 20 डिसेंबरच्या मध्यरात्री बारापर्यंत जमाबंदीचा आदेश लागू केला आहे दरम्यान आज सकाळपासून खडकपोली बंद पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.