मुंबई: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांचा केरळच्या वायनाड लोकसभा पोटनिवडणूकीत विजय झाला. यानंतर आज (गुरुवारी) त्यांनी खासदारकीची शपथ घेतली आहे. पहिल्याच निवडणुकीत प्रियंका गांधी चार लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. यावेळी प्रियांका गांधी हातात संविधानाचे पुस्तक घेऊन आल्या आणि त्यांनी शपथ घेतली.
वायनाडमध्ये प्रियांका गांधींच्या विरुद्ध सत्ताधारी डाव्या आघाडीतर्फे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सत्यन मोकेरी आणि भारतीय जनता पक्षाने नव्या हरदास यांना उमेदवारी दिली होती. या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधींना ६.२२ लाख मतांनी विजय मिळाला.
वायनाडमधील काँग्रेस नेत्यांनी काल निवडणुकीतील विजयाचे प्रमाणपत्र प्रियांका गांधी यांना सुपूर्द केले. या वेळी राहुल गांधी हे देखील उपस्थित होते.
दरम्यान, राहुल गांधी रायबरेलीमधून खासदार आहेत, प्रियंका वायनाडमधून तर सोनिया गांधी राज्यसभेच्या खासदार आहेत. प्रियांका आता भाऊ राहुल गांधी यांच्यासह लोकसभेत केंद्र सरकारला कोंडीत पकडतील, असे मानले जात आहे.