उत्तूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व आजरा पंचायत समितीचे माजी सभापती उमेश आपटे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला. मंत्री मुश्रीफ यांनी आपटे यांच्या उत्तूर येथील घरी जाऊन भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, उमेश आपटे यांनी माझ्या विधायक कार्याला आणि जनसेवेला हे समर्थन दिले आहे. या पाठिंब्याबद्दल मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन.
आपटे म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफसाहेब हे एक कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे नेतृत्व आहे. स्वार्थ न पाहता एक समर्पित भावनेने स्वतःचा प्रचंड वेळ देऊन सकाळी साडेपाच वाजल्यापासून समाजसेवेत रुजू होतात. अशा एका चांगल्या माणसाला आम्हीसुद्धा मागचा- पुढचा कोणताही विचार न करता त्यांना समर्थन दिले आहे. एक चांगला कर्तबगार माणूस म्हणून आम्ही त्यांच्या मागे समर्पणाच्या भावनेने उभे आहोत. त्यांच्याकडून आमची एकच मागणी आहे की, ज्या गावांना शेतीच्या पाण्याची व्यवस्था नाही त्या गावांमध्ये पाणी योजना मुश्रीफसाहेबांनी करून द्याव्यात.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, योग्यवेळी एका वळणावर उमेश आपटे यांनी मला पाठिंबा देऊन दहा हत्तीचे बळ दिले आहे. त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आम्ही सातत्याने सन्मानच करू. मी आणि माझे कार्यकर्ते यांच्यामध्ये कधीही दुजाभाव करणार नाही.
यावेळी उत्तुर येथील उमेश आपटे गटाचे विश्वनाथ करंबळी, सरपंच किरण अमनगी, संजय उत्तूरकर, राजू खोराटे, भैरू कुंभार, अशोक पाटील, नारायण देसाई- बेलेवाडी हुबळगी, सुभाष पाटील -आर्दाळ, विजय गुरव -मुमेवाडी, विद्याधर गुरव -आरदाळ, संभाजी पाटील- वझरे, तसेच; गणपतराव यमगेकर, बाळासाहेब हजारे, वसंतराव धुरे, आप्पा शिवणे, एम. जी. घोरपडे, शिरीष देसाई, धनराज घाटगे, सुधीर सावंत आदी प्रमुख उपस्थित होते आदी प्रमुख उपस्थित होते.
माणसातला देवमाणूस…….!
विश्वनाथ करंबळी म्हणाले, मंत्री हसनसाहेब मुश्रीफ हे विकासाचे जादूगार व माणसातला देवमाणूस आहेत. त्यांचे काम आणि संपर्कावर आम्ही भारावून गेलो आहोत. निश्चितच विजयाचे मुकुट त्यांना लाभणार आहे. ते समाजासाठी वेळ देतात हीच खूप मोठी गोष्ट आहे. आज विरोधक चार ठेकेदारांच्यावर बोलत आहेत. त्यांनी असंख्य ठेकेदारांना आणि त्या अनुषंगाने काम करत असणाऱ्या असंख्य कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यामुळे बोलणं सोपं असतं मात्र करणं अवघड असतं, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.