मुंबई:वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले त्याबद्दल धन्यवाद पण झारखंड व पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकाना तात्काळ हटवले होते, रश्मी शुक्ला यांना हटवण्यास एवढा उशिर का लागला? असा प्रश्न उपस्थित करुन आता रश्मी शुक्ला यांना निवडणुसंदर्भातील कोणतेही काम देऊ नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटवल्यानंतर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, रश्मी शुक्ला या वादग्रस्त अधिकारी आहेत, त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते, त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत, असे असतानाही देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या फायद्यासाठी रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची बेकायदेशीर मुदतवाढ दिली होती. रश्मी शुक्ला यांच्यामुळे निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे होतील याबदद्ल शंका असल्याने त्यांना पोलीस महासंचालक पदावरून तात्काळ हटवावे अशी मागणी करणारे पत्र निवडणूक आयोगाला २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाठवले होते, त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन शुक्ला यांना हटवण्याचे निवेदनही दिले होते त्यानंतरही शुक्ला यांना हटवले नाही. त्यानंतर ३१ ऑक्टोबर व ४ नोव्हेंबर रोजी पुन्हा निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवले होते. अखेर निवडणूक आयोगाने उशिराने का होईना रश्मी शुक्ला यांना हटवले आहे, असे नाना पटोले म्हणाले.