कोल्हापूर: गोवा येथे दिनांक २७/१०/२०२४ इ.रोजी पार पडलेल्या ‘आयर्न मॅन ७०.३’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे कर्मचारी नामदेव मारुती कळंत्रे रा. इचलकरंजी हे गोकुळमधील पहिले ‘आयर्नमॅन’ कर्मचारी ठरलेबद्दल गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे संचालक व अधिकारी उपस्थिती होते.
यावेळी, बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, आरोग्य चांगले व तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम व योग्य आहार महत्वाचा असून प्रत्येकाने आपले शरीर स्वास्थ चांगले कसे राहील यासाठी प्रयत्न करणे गरजेच असून गोकुळचे वरिष्ठ अधिकारी नामदेव कळंत्रे यांनी जिद्दीच्या व मेहनीच्या जोरावती अवघड अशी हि स्पर्धा विहित वेळेपूर्वी पूर्ण करून ‘आयर्नमॅन’ (लोहपुरुष) हा किताब पटकावला. या मिळविलेल्या यशामुळे गोकुळ दूध संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे गौरोवद्गार चेअरमन डोंगळे यांनी याप्रसंगी काढले. तसेच नामदेव कळंत्रे यांना यापुढे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आवश्यक ती आर्थिक मदत व सहकार्य गोकुळमार्फत करणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
सत्काराला उत्तर देताना नामदेव कळंत्रे म्हणाले की, जिद्द चिकाटी व ध्येयासक्ती हा कोल्हापूरच्या मातीचाच गुण असून सरावासाठी योग्य वातावरण असल्यामुळे ‘आयर्न मॅन’ झालो. यासाठी गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व सर्व संघाचे संचालक मंडळ, प्रशिक्षक, संघाचे कर्मचारी व अधिकारी यांचे बहुमोल सहकार्य व प्रोत्साहन लाभले असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यामध्ये ६१ देशातील सुमारे १,५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये एकूण ११३ किमीचे अंतर कळंत्रे यांनी अवघ्या साडेसात तासात पूर्ण केले. यामध्ये २ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी धावणे अशा प्रकारात हे अंतर साडेआठ तासात पूर्ण करायचे होते. सुमारे ३६ डिग्री तापमान सहन करीत हे अंतर त्यांनी कमी वेळेत पूर्ण करून कोल्हापूरचे नाव उंचावले.
यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, प्रशिक्षक अमरपाल कोहली, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक जगदीश पाटील तर आभार शाहीर सदाशिव निकम यांनी मानले. यावेळी कळंत्रे यांचे प्रशिक्षक अमरपाल कोहली यांचा ही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.