स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बेळगाव – गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन २०० रूपयाचा दुसरा हप्ता तातडीने द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. गतवर्षीचा दुसरा हप्ता तातडीने द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात काढण्यात आला.

 

यावेळी, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्विकारून तातडीने कारखानदारांची बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, या वर्षीच्या हंगामामध्ये साखर व उपपदार्थामध्ये साखर सरासरी २२५ ते २७५ रूपये , बगॅस प्रतिटन १ हजार रूपये व मळी प्रतिटन २२०० ते २४०० रूपयापेक्षा जादा दर मिळाला आहे.

कर्नाटक सीमाभागातील सर्वच कारखाने प्रतिटन ३००० रूपये दर दिलेले आहेत. महाराष्ट्रातील साखर कारखाने ३३०० पासून ते ३६५० पर्यंत दर दिलेले आहेत. वाढलेली महागाई , खताचे वाढलेले दर , साखर कारखानदार यांच्या इशा-यावरून उसतोडणीसाठी साखर कारखान्याचे चिटबॅाय व मुकादम यांचेकडून होणारी शेतक-यांची लूट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कर्नाटकात काटामारी व रिकव्हरी चोरी जोमात असते, याचा फटका शेतकर्यांना बसतो. गतवर्षीच्या गळीत हंगामात तुटलेल्या उसाला २०० रूपये प्रतिटन दुसरा हप्ता दिवाळीपुर्वी शेतक-यांच्या खात्यात जमा होणे गरजेचे आहे.

तरी दिवाळीपुर्वी तातडीने गतवर्षी तुटलेल्या ऊसास २०० रूपयाचा दुसरा हप्ता जमा करावा अन्यथा यंदाचा गळीत हंगाम सुरळीत सुरू होवू देणार नाही असा इशारा शेट्टी यांनी दिला. यावेळी श्री गणेश, राजेंद्र गडड्यान्नावर, सुरेश चौगुले, तात्यासो बसन्नावर, राजू खिचडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होेते.