वसगडे क्रिडांगण विकासासाठी गायरान मधील २ हेक्टर जागा मंजूर;आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

वसगडे: कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील मौजे वसगडे (ता. करवीर) येथे क्रीडांगण विकसित करण्यासाठी २ हेक्टर ४० आर गायरान जमीन ग्रामपंचायतीला उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महसूल व वन विभागाच्यावतीने ९ ऑक्टोबर रोजी याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मौजे वसगडे येथे क्रीडांगण विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील विविध गावमध्ये क्रीडांगणे विकसीत केली जात आहेत. करवीर तालुक्यातील मौजे वसगडे येथे क्रीडांगण विकसीत करण्यासाठीही आमदार पाटील यांनी पुढाकार घेतला होता. मात्र त्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने गायरान मधील जागा क्रीडांगणासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती आमदार पाटील यांनी विविध यंत्रणांच्या माध्यमातून केली होती. याबाबत ५ मार्च २०२४ रोजी महसूल व वनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र देऊन मौजे वसगडे येथील गायरान जमीन क्रीडांगणासाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्याची विनंती केली होती.

याबाबत आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून सुरु असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. करवीर तालुक्याल मौजे वसगडे येथील गट नं.८८८ मधील ८.४९ हेक्टर आर जमीनीपैकी २.४० हेक्टर आर जमीन “क्रीडांगण” या सार्वजनिक प्रयोजनाकरीता अटी शर्थीच्या अधीन राहून कोल्हापुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रतिवर्ष १ रुपये नाममात्र दराने १५ वर्षासाठी भाडेपट्टयाने प्रदान करण्यास शासनाने ९ ऑक्टोबरच्या निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे.यामुळे मौजे वसगडे येथील क्रीडांगणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे खेळाडूंना चालना मिळणार असून ग्रामीण भागातील खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील वसगडे येथे क्रीडांगण नसल्याने खेळाडूंची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे गायरान जमिनीमध्ये क्रीडांगण विकसित करण्याची मागणी खेळाडू व ग्रामस्थाकडून होत होती. याबाबत आपण मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत होतो. या प्रयत्नाना यश आले असून शासनाकडून उपलब्ध होत असलेल्या जमिनीवर लवकरात लवकर क्रीडांगण विकसित करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही आमदार ऋतूराज पाटील यांनी दिली. तसेच जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत.क्रीडांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल गावातील खेळाडू ,तरुणांनी आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांचे आभार मानले आहेत.