तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यासह युद्धकला प्रात्यक्षिकांनी उपस्थितीतांना केले रोमांचित

कोल्हापूर : तरुणांमध्ये चपळता उत्साह, चणचणीतपणा, खिलाडूवृत्ती, सहनशिलता यायची असेल तर आपल्याला युध्दकला येणे आवश्यक असल्याचे युध्द कला प्रात्यक्षिक पाहताना भवानी मंडप येथील सादरीकरण पाहून दिसून आले. हलगीच्या निनादावर युवा रणरागीणी, तरुणांनी प्रात्यक्षिके अतिशय सुंदर सादर केली. यावेळी खेळाडूंनी सादर केलेली तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यासह युद्धकला प्रात्यक्षिकांनी उपस्थितीतांना रोमांचित केले.

 

शाही दसरा महोत्सवाच्या अनुषंगाने कोल्हापुरात भवानी मंडपात युद्ध कला प्रात्यक्षिके आज संपन्न झाली. या युध्दकला प्रात्यक्षिकांच्या स्पर्धेत शिवशाही मर्दानी आखाडा, शिवगर्जना प्राचीन युध्दकला, स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा, राजे मर्दानी आखाडा पाचगाव, शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच, छत्रपती शिवाजीराजे मर्दानी आखाडा पुणे, श्रीमंतयोगी मर्दानी आखाडा, हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाडा, शांतीदूत मर्दानी आखाडा, राजमुद्रा प्रतिष्ठान, कै. आनंदराव पोवार प्राचीन युध्दकला, जयभवानी मर्दानी खेळ व शिवछत्रपती मर्दानी आखाडा निगवे या संघातील कलाकरांनी प्राचीन युद्ध कलांचा रोमांच निर्माण करणारा थरार सादर केला. या युध्दकला स्पर्धेत विविध पुरस्कार प्राप्त तसेच विविध सिनेमा, नाटकांमध्ये युध्द कला सादर केलेल्या कलाकारांनी सहभाग घेतला होता.

संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये दांडपट्टाचा उल्लेख आहे. तसेच तुकारामांच्या गाथामध्ये अंगावरती पट्टे फिरवत शत्रू जवळ येऊ नये, अशा दांडपट्टाचा उल्लेख आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा दांडपट्टा होता त्याचे नाव यशवंत असून आजही कागदोपत्री त्याची नोंद असल्याचे दिसून येते. यावेळी सादर करण्यात आलेली कला खरोखराच तालीमकारांनी आजही जिवंत ठेवली आहे. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून भरुभरुन उपस्थित कलाकारांना प्रोत्साहन दिले.