नवी दिल्ली : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र प्रकरणाच्या सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या मंगळवारी सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात २ दिवसापूर्वी कोर्टाच्या दैनंदिन कामकाजाच्या यादीत हे प्रकरण २२ ऑक्टोबर रोजी दाखवण्यात आले होते. मात्र, या प्रकरणाबाबत अनेक महिने सुनावणी झालेली नाही. येत्या २४ सप्टेंबर रोजी याबाबत सुनावणी झाल्यास सर्वोच्च न्यायालयाकडून याबाबत निर्देश मिळू शकतात.
शिवसेना पक्ष फुटीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन नेत्यांसोबत गेलेल्या आमदारांबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटातील आमदारांना अपात्र केले नाही.
याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. वारंवार याबाबत तारीख पे तारीख पडत असल्याने उद्धव ठाकरे गटाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र देऊन चिन्हाचा निकाल लागेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह गोठवावे, असे लेखी पत्र दिले होते. यामुळे अजित पवार गटात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता पसरली होती. आता २४ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते, हे पाहावे लागेल.