कोल्हापूर : हसन मुश्रीफ आणि समरजीतसिंह घाटगे हे युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांना सन्मान देत नाहीत, कामे करत नाहीत म्हणून आम्हाला महायुतीतून मोकळे करा. मग युवाशक्तीची ताकद दाखवतो. अशा भावना धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. महाडिक यांच्या कार्यालयात झालेल्या मेळाव्यात कार्यकर्ते बोलत होते.
धनंजय महाडिक युवाशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली. यामध्ये विजय फुटाणे, सागर देसाई, पिंटू मांगले, समीर चांद, सागर गंधवाले, स्वप्नील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले..
यावेळी युवाशक्तीचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष बाळ बोटे पाटील म्हणाले की, आमच्यासाठी धनंजय महाडिक नेते असून ते ज्या पक्षात जातील तो पक्ष आमचा पण आम्ही कोणत्या पक्षाचे नाही. आम्ही सर्व महाडिक परिवाराचे आहोत.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, राजकारणात नेहमी संयमी भूमिका घ्यावी लागते. आज मी भाजपमध्ये आहे या पक्षाने मला राज्यसभेचे खासदार केलं. त्यामुळे जिल्ह्यात विकासाची अनेक कामे करू शकलो. सत्ता असेल तर आपण सर्व काही करू शकतो. त्यामुळे मनात संभ्रम न ठेवता महायुतीच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी प्रयत्न करा. यावेळी कृष्णराज महाडिक, माजी नगरसेवक सत्तेजित कदम, शिवाजी मगदूम, जोतीराम जाधव यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.