शिवारे माणगांव या शाळेतील ४० विद्यार्थ्यांची वारणा विज्ञान केंद्राला भेट ;

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे

शिवारे माणगांव (ता.शाहूवाडी) येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालय, शिवारे माणगांव या शाळेतील ४० विद्यार्थ्यांनी वारणा विज्ञान केंद्राला भेट दिली.शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांनी ‘संकल्प वारणेचा: एक दिवस वारणा विज्ञान केंद्रामध्ये’ ह्या उपक्रमात सहभाग नोंदविला.

 

 

 

शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील दररोज एका शाळेतील एका वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरत असल्याचे नमूद करताना मागील दोन वर्षापासून चालू असलेल्या उपक्रमात आजपर्यंत सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांनी तर या शैक्षणिक वर्षात १९ शाळांमधून सुमारे १ हजार विद्यार्थ्यांनी ‘संकल्प वारणेचा: एक दिवस वारणा विज्ञान केंद्रामध्ये’ या उपक्रमात सहभाग नोंदविला असल्याची माहिती आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी दिली…

शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलचे कुतूहल निर्माण व्हावे, विज्ञानातील संकल्पना सहज अवगत करता याव्यात, कृतिशील प्रयोगातून कल्पकता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समुहाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या संकल्पनेतून श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित वारणा विज्ञान केंद्रामार्फत ‘संकल्प वारणेचा: एक दिवस वारणा विज्ञान केंद्रामध्ये’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे प्रिन्सिपल कोऑर्डिनेटर डॉ.जॉन डिसोझा यांनी सांगितले…

इ.५ वी ते १० वीतील विद्यार्थी मनोरंजनातून वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यासाठी, नाविन्यपूर्ण प्रयोगातून विज्ञानाचे धडे गिरवण्यासाठी फन सायन्स लॅब, इनोव्हेशन लॅब आणि मल्टीपर्पज हॉल या अद्यावत सुविधांचा लाभ घेत आहेत. तसेच मुंबई, बेंगलोर नंतर वारणेत उभारण्यात आलेल्या जागतिक दर्जाच्या तारांगणामध्ये ग्रह, तारे, आकाशगंगा, तारकासमूह, राशी-नक्षत्र इत्यादींची शास्त्रीय माहिती चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवली जाते. वारणा बाल वाद्यवृंदातील कलाकारांच्या संगीत सादरीकरणानंतर एकूण दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होते…

आतापर्यंत फक्त पुस्तकात वाचलेल्या संकल्पनांवर आधारित प्रयोग करून विज्ञान सोप्या पद्धतीने समजून घेता आले अशी प्रतिक्रिया यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी नोंदविली. या उपक्रमाच्या नियोजनासाठी राजेंद्र पाटील, प्रा.नामदेव चोपडे,विजय पाठक,सायंटिफिक ऑफिसर प्रितेश लोले,किमया पाटील,पूनम चौगुले,वैष्णवी पोवार यांनी विशेष प्रयत्न घेतले तसेच श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक यांच्यासह आदी मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले.

🤙 9921334545