मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीत नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बाजूला बसावे लागते. पण बाहेर आल्यानंतर मला उलट्या होतात, असे विधान केले आहे. यांनतर महायुती सरकार मध्ये चांगलाच वाद पेटला आहे. अजित पवार गटाकडून आता तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
जोपर्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले आहे. अन्यथा महायुती आणि सत्तेतून बाहेर पडू, असा इशाराही राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेस तपासे यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. “अजित पवारांसारखा एक नेता अशा प्रकारचा अपमान कसे काय सहन करू शकतो, हेच कळत नाही. सत्तेसाठी एवढी लालसा अजित पवारांच्या मनात असेल, हे कधी वाटले नव्हते. त्यांच्यातला स्वाभिमानी बाणा कुठे हरपला? याचा शोध त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे, असा टोला महेश तपासे यांनी लगावला.