मंचुरियन, पनीर टिक्का, चिकन चिली ते चायनीज भेळीसहीत अन्य अनेक पदार्थांच्या जोडीला वाढल्या जाणाऱ्या कोबीला खूप फायदे मिळू शकतात. आठवड्यातून एकदा कोबीची भाजी खाल्ल्याने शरीराला विविध फायदे मिळू शकतात. पचनास मदत करण्यापासून ते जुनाट आजार होण्याचा धोका कमी करण्यापर्यंत, तुमच्या जेवणात कोबीचा समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरू शकते.
कोबी हा फायबरचा समृद्ध स्रोत आहे व फायबर हा पचनप्रक्रियेत योगदान देणारा महत्त्वाचा घटक आहे. कोबीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. याव्यतिरिक्त, कोबीमधील काही फायबर प्रीबायोटिक्स म्हणून कार्य करतात, तुमच्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंना आहार देतात. हे आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.
कोबी हा जीवनसत्त्वांचा खजिना आहे. यातील व्हिटॅमिन सी तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवतो आणि निरोगी त्वचेसाठी कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देतो. कोबीमध्ये व्हिटॅमिन के देखील आहे, जे रक्ताच्या गुठळ्या थांबवण्यासाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. कोबीमधील बी जीवनसत्त्वे चयापचय आणि मज्जासंस्थेच्या कार्यामध्ये भूमिका बजावते.
कोबी ही कमी-कॅलरी, कमी चरबीयुक्त भाजी आहे, त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. कोबीमधील फायबर तुम्हाला जास्त काळ पोट भरल्याचे भासवते त्यामुळे सतत खाण्याचे प्रमाण कमी होऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.प्रत्येकी एक कप कोबीमध्ये ३३ कॅलरीज व उच्च फायबर असते. त्यामुळे कोबीची भाजी आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते, बद्धकोष्ठता आणि जळजळ रोखण्यात मदत करू शकते आणि यकृताच्या आरोग्यास प्रोत्साहन देऊ शकते.