राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक लोकसभा मतदारसंघातील सटाणा येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी व्यासपीठावर शरद पवारांचे भाषण सुरु असताना बॅनर कोसळल्याची दुर्घटना घडली.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार व अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे, राजकीय नेत्यांनाही या अवकाळी व बदलत्या हवामानाचा फटका बसल्याचं दिसून आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह काही नेत्यांच्या सभाही अवकाळीमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. तर, मुंबईतील घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना झाली असताना पुन्हा एकदा बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सटाणा सभा सुरू असताना सोसाट्याचा वारा सुरू झाला. मात्र, तरीही पवारांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं होतं. मात्र, यावेळी, व्यासपीठावरील बॅनर कोसळल्याची घटना घडली.
मुंबईतील जाहिराताचा बॅनर कोसळून 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अजून ताजी असतानाच राजकीय सभेदरम्यानही डिजिटल बॅनर कोसळल्याची घटना घडली. शरद पवारांच्या सटाणामधील सभेत भाषण सुरू असताना बॅनर कोसळल्याची दुर्घटना घडली. सटाण्यात शरद पवार यांचे भाषण सुरू असताना वादळी वारे सुटले होते, या वाऱ्यामुळे सभेच्या व्यासपीठावरील बॅनर कोसळत होता. शरद पवार भाषण करत असलेल्या पाठिमागील बॅनर पडला. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही जखम झाली नाही. व्यासपीठावर जे कार्यकर्ते होते, त्यांनी हा बॅनर वरचेवरच घेतल्याने अनर्थ टळला. मात्र, बॅनर कोसळल्याची घटना समजताच शरद पवारांनी आपले भाषण उरकते घेतले.