नाशिक महापालिकेच्या हद्दीत राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा भूसंपादन घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. “राज्याच्या नगरविकास खात्याने नाशिकमध्ये तब्बल ८०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा केला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मी या घोटाळ्याचे पुरावे सादर करून मोठा स्फोट करेन”, असं राऊत त्यावेळी म्हणाले होते. आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक महापालिकेत झालेल्या ८०० कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी पत्र पाठवले. तसंच हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवलंय. “विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नाशिक महापालिकेमार्फत खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचे अर्थात जमिनी ताब्यात घेऊन विकत घेण्याचे अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यात नाशिक शहरातील ठराविक बिल्डरांचे आर्थिक हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनाच सातशे कोटी रुपये जमिनींचा मोबदला म्हणून वाटप करून मोठा घोटाळा करण्यात आला. यामुळेच मुख्यमंत्री या प्रकरणाची चौकशी टाळून संबंधित बिल्डरांना पाठीशी घालत आहेत”, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्या पात्रात त्यांनी बिल्डरांनी आर्थिक फायदा घेताना मुद्रांक शुल्क, आयकर, नजराणा मोठ्या प्रमाणात बुडवून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. मोबदला देण्याची आवश्यकता नसलेल्या अनेक जागांसाठी नियमबाह्यपणे कोट्यवधी रुपयांचा मोबदला दिला गेला आहे, असं म्हटलं आहे.