प्रतिनिधी (कोल्हापूर) : लोटस मेडिकल फाउंडेशन संस्थेतर्फे कोल्हापुरातील पहिल्या LGBTQ+ क्लिनिकला सुरुवात झाली. हे क्लिनिक उद्यम नगर येथील संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आले. LGBTQAI + समुदायाच्या विविध गरजा आहेत त्यापैकी त्यांचे आरोग्य ही सर्वात महत्वाचे आहे. या समुदायाला सतत संघर्ष करावा लागत असल्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येते. यासाठी “एलजीबीटीक्यू चे मानसिक आरोग्य” यावरती मानसशास्त्रज्ञ आम्रपाली जोशी यांनी मार्गदर्शन केले.
लैंगिकता, लैंगिक ओळख, लैंगिक अभिमुखता इत्यादी बाबतची माहिती सर्वांना असतेच असं नाही. फक्त स्त्री आणि पुरुष याशिवाय वेगळी लैंगिक ओळख ही असू शकते हे सर्वसामान्य माणसांना देखील माहित असणे आवश्यक आहे. यासाठी शाळा,कॉलेज, आणि समाज इत्यादी ठिकाणी जनजागृती होणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांना समान वागणूक मिळेल आणि सामान्य माणसांनाही या समुदयातील सभासदांना सामावून घेण्याची मानसिकता तयार होईल. अशी वेगळी ओळख असणाऱ्यांना तसे सांगण्याची हिंमत येईल. यासाठी वर्तमानापत्र, मीडिया अशा माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवर मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. या समुदयातील प्रत्येक घटकाने या क्लिनिकचा लाभ घ्यावा असे यावेळी सांगण्यात आले.
मैत्री संघटनेच्या मयूरी आळवेकर,अभिमान संस्थेचे विशाल पिंजानी, LGBTQ + चे सदस्य, आय सी. टी. सी. समुपदेशक सुरेखा माने, श्रेया पाटील, लोटस मेडिकल फाऊंडेशनच्या डॉ. किमया शहा व कर्मचारी उपस्थित होते. सदरील चर्चा सत्र संयोजनासाठी संस्थेच्या अध्यक्ष उषा थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.