सुधीर फडकेंचे अष्टपैलुत्व साकारण्याचा चित्रपटातून प्रयत्न : योगेश देशपांडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गायक,संगीतकार, प्रखर राष्ट्रभक्त, दादरा नगर, हवेली स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि सावरकर प्रेमी असे सुधीर फडके यांचे असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटातून साकारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी दिली.


येथील अक्षर दालन आणि निर्धार यांच्यावतीने ‘अक्षरगप्पा’च्या ११२ व्या कार्यक्रमामध्ये बुधवारी हा संवाद घडला. रसिक श्रोत्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. चित्रपटात सुधीर फडके यांची भूमिका साकारणारे सुनील बर्वे आणि ग.दि.माडगुळकर यांची भूमिका करणारे कोल्हापुरचे सुपूत्र सागर तळाशीकर यांनीही आपली भूमिका मांडली. रविंद्र जोशी, प्राचार्य जॉन डिसोझा, ऍड.सचिन इंजल यांनी या तीनही मान्यवरांचे स्वागत केले.
योगेश देशपांडे म्हणाले, येत्या १ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून यामध्ये सुधीर फडके यांच्या कोल्हापूरच्या जडणघडणीच्या कालावधीचेही चित्रीकरण आहे. लहानपणीच आईचे निधन, घरी आलेली दारिद्र्याची अवस्था, त्यातूनही गाणं शिकण्यासाठी काहीही करण्याची तयारी आणि नंतर कर्तबगारीचे एक एक सोपान चढण्याची त्यांची कामगिरी, मोहम्मद रफी यांनी फडके यांच्या विवाहप्रसंगी गायिलेल्या मंगलाष्टका या सगळ्या आठवणी यावेळी सांगण्यात आल्या. माडगुळकर यांच्या भूमिकेसाठी वजन वाढवण्यात आल्याचे यावेळी सागर तळाशीकर यांनी सांगितले. तर सुनील बर्वे यांनी ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ गीताचे गायन करून उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. यावेळी राम देशपांडे, डॉ. भाग्यश्री मुळे, डॉ. कविता गगराणी, प्रा. मानसी दिवेकर, नितीन कुलकर्णी, विश्वराज जोशी उपशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

भारावलेले वातावरण सुधीर फडके यांच्या गीतांची जादू ज्यांच्यावर आहे असे अनेकजण या कार्यक्रमाला अगत्याने उपस्थित होते. यातूनच मग अनेकांनी अभ्यासू प्रश्न विचारले. बर्वे यांचे गायन, फडके यांचे नातू नरेंद्र फडके यांना आजोबांच्या आठवणीने आलेले अश्रू आणि कार्यक्रम संपताना खद्द फडके हे गीताला चाल लावतानाचा एक छोटा दाखविण्यात आलेला व्हीडीओ यामुळे सुमारे सव्वा तास भारावलेले वातावरण उपस्थितांनी अनुभवले.