खोकुर्ले: (ता.गगनबावडा) येथे वनखात्याने लावलेल्या सी.सी.टी.व्ही. मध्ये बिबट्या दिसून आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसापूर्वी खोकुर्ले येथील धोंडीराम विठोबा गायकवाड यांच्या घराजवळील गोठ्यातून बिबट्याने शेळीचा फडशा पाडला होता.
तर बाळू कसबले यांच्या कुत्रीवर बिबट्याने हल्ला केला होता.मानवी वस्तीमध्ये बिबट्या आल्याने नागरिक शेतामध्ये जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे शेती व दुग्ध व्यवसाय करणारे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. वनखात्याचे कर्मचारी वनपरीक्षेत्र अधिकारी प्रियांका भवर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अमर वेटाळे, वनरक्षक संग्राम पाटील, वनसेवक विजय सूर्यवंशी, पांडुरंग पाटील, आनंदा पाटील व रेस्क्यू टीम या बिबट्याच्या शोधात असून त्यांनी लावलेल्या सी.सी.टी.व्ही.मध्ये बिबट्या स्पष्ट दिसत आहे. या बाबत नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे. या बिबट्याचा वनखात्याने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, संध्याकळी शेतात काम करताना लवकर घरी यावे असे आवाहन सरपंच सुनिता कांबळे यांनी नागरिकांना केले आहे.